राजीव गांधी हत्याप्रकरणातील आरोपी ३० दिवसांच्या सुट्टीवर
देश बातमी

राजीव गांधी हत्याप्रकरणातील आरोपी ३० दिवसांच्या सुट्टीवर

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी ए. जी. पेरारीवल याची ३० दिवसांसाठीची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. या आरोपीच्या आईच्या विनंतीवरुन तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी ही सुट्टी मंजूर केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरोपी पेरारीवलन याच्या आईने सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना पत्र लिहित ही सुट्टी मंजूर करण्याची विनंती केली होती. पेरारीवलन कोरोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्यांच्या गटात मोडत असल्याचं कारागृहातल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर पेरारीवलनचे उपचार अद्यापही पूर्ण झाले नसल्याने त्याला उपचाराची गरज असल्याच्या कारणावरुन त्याच्या आईने या सुट्टीची मागणी केली होती.

मागच्या वेळच्या त्याच्या सुट्टीमध्ये त्याला उपचार मिळू शकले नाहीत. कारण, करोना प्रादुर्भावामुळे हॉस्पिटलचे सर्व वॉर्ड्स करोना वॉर्डमध्ये रुपांतरीत करण्यात आले होते. त्याचबरोबर पेरारीवलनची आई, अर्पूथम्मल यांनी आपल्या पत्रामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांची संख्या कमी करण्याबद्दलही सुचवलं आहे. सुट्टीला मंजुरी मिळाल्यानंतर त्या म्हणाल्या, आईच्या भावना आणि पेरारीवलनचं आरोग्य या दोन गोष्टी लक्षात घेऊन मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सुट्टी मंजुर केली त्यामुळे मी त्यांचे आभार मानते.