राष्ट्राध्यक्षांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी; चेंगराचेंगरीत ४५ जणांचा मृत्यू
बातमी विदेश

राष्ट्राध्यक्षांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी; चेंगराचेंगरीत ४५ जणांचा मृत्यू

दार ए सलेम : टांझानिया देशाचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन मागुफूली यांच्या पार्थिवाचं दर्शन घेताना मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ४५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना मागील आठवड्यामध्ये घडली असली तरी यासंदर्भातील खुलासा टाझांनियामधील पोलिसांनी मंगळवारी केला. याबाबतचे वृत्त असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दार ए सलेम येथे चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना घडली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागुफूली यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक शहरामध्ये दाखल झाले होते. सर्वसामान्यांना दर्शन घेता यावं म्हणून दार ए सलेममधील एका स्टेडियममध्ये मागुफूली यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. मात्र या स्टेडियममध्ये नियोजित ठिकाणाहून प्रवेश करण्याऐवजी अनेक जण संरक्षक भिंतींवर चढून प्रवेश करत होती. त्याचवेळी एका बाजूची भिंत पडली आणि एकच गोंधळ उडाला. या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ४५ जणांचा मृत्यू झालाय.

मागुफूली यांचा मृत्यू हृदयासंदर्भातील विकारामुळे झाला. मात्र विरोधी पक्षाने कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या मेडिकल कॉम्पिकेशनमुळे मागुफूली यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. १७ मार्च २०२१ रोजी मागुफूली यांचं निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. मागुफूली यांच्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष असणाऱ्या सामिया सुलुहू हसन या राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान झाल्या आहेत. सामिया या टांझानियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत.