अखेर नरेंद्र मोदी कृषी कायद्यांवर बोलले; म्हणाले…
देश बातमी

अखेर नरेंद्र मोदी कृषी कायद्यांवर बोलले; म्हणाले…

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. देशभरातून कृषी कायद्यांना विरोध होत असून शेतकऱ्यांसह विरोधकांकडूनही हे कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनात झालेल्या घडामोडींवर आता पर्यंत शांत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले आहे. पंतप्रधानांनी कृषी मंत्र्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा हवाला देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कृषी कायद्यांना होत असलेल्या विरोधावर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “सभागृहात शेतकरी आंदोलनाची भरपूर चर्चा झाली. जास्तीत जास्त वेळ जे मुद्दे मांडले गेले, ते आंदोलनासंदर्भातले आहेत. पण, कोणत्या गोष्टीसाठी आंदोलन आहे, यावर मात्र सगळे गप्प आहेत. आंदोलन कसं आहे. आंदोलकांसोबत काय होतंय. पण, मूळ मुद्द्यांवर चर्चा झाली असती, तर चांगलं झालं असतं. कृषीमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, याची मला खात्री आहे,” अशी टोला मोदींनी विरोधकांना लगावला.

ते पुढे म्हणाले की, “समोर अनेक आव्हानं आहेत. पण, समस्येचा भाग व्हायचं की, समाधानाचा? हे आपल्याला ठरवावं लागेल. छोटी रेषा आहे. जर समस्येचा भाग बनलो तर राजकारण होईल. समाधानाचा भाग झालो तर राष्ट्राच्या धोरणाला चार चाँद लागतील. वर्तमान पिढीबरोबरच नव्या पिढीचाही विचार करणं, हे आपलं दायित्व आहे. समस्या आहेत, पण सोबत काम केलं तर निश्चित यश मिळवू,” असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी दैवेगोडा यांचा आभारी आहे. त्यांनी सरकारने केलेल्या कामाचं कौतुक केलं. त्याचबरोबर चांगल्या सूचनाही केल्या. शेतीची मूळ समस्या काय आहे? याबद्दल माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनी जे सांगितलंय ते सांगू इच्छितो. बहुतांश शेतकरी असे ज्यांच्याकडे एक हेक्टरपेक्षा कमी जमीन, असे शेतकरी आता ६१ टक्के आहेत, ८६ टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन, असे शेतकरी १२ कोटी आहेत. या शेतकऱ्यांची देशावर काही जबाबदारी नाही का?. केंद्राला यांना डोळ्यासमोर ठेवावं लागेल की, नाही. चौधरी चरणसिंग यांनी आपल्यासाठी हे प्रश्न सोडून गेले आहेत. त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. निवडणुका आल्या की कर्जमाफीची योजना राबवतो. तो शेतकऱ्यांची योजना आहे की, मतं मिळवण्याचा हे सर्वजणांना माहिती आहे,” असं टीकास्त्र मोदींनी कर्जमाफी मुद्द्यावरून डागलं.