कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा रद्द
बातमी मराठवाडा

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा रद्द

नांदेड : दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरवर्षी लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील श्री खंडेरायाची देवस्वारी (पालखी सोहळा) आयोजित केला जातो. तसेच, कोविड -19 परिस्थिती लक्षात घेता यावर्षी श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा व उत्सावाच्या अनुषंगाने विविध बाबींवर जिल्हाधिकाटी डॉ . विपीन इटनकर यांनी प्रतिबंध केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जिल्हा परिषदेने यंदाच्या यात्रेबाबत पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ११ जानेवारी रोजी श्री खंडेरायाची देवस्वारी पालखी सोहळा परंपरेनुसार होणार आहे. मात्र कोविड -19, शासन अधिसूचना 21 सप्टेंबर 2020 नुसार व जनावरात होणारा लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता कृषी प्रदर्शन, बचत गटांचे स्टॉल लावले जाणार नाहीत. तसेच, यावर्षी माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्यावतीने भरवण्यात येणारे विविध विभागाचे स्टॉल, कृषि प्रदर्शन, पशुप्रदर्शन, बचतगटांच्या वस्तु प्रदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाही.

यात्रा तोंडावर आली तरी यंदा यात्रेसंदर्भात कुठलीच चर्चा होताना दिसून आली नाही. त्यामुळे कोरोना व ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता या वेळची यात्रा होणार की नाही, याबाबत साशंकता होती. कारण ग्रामीण भागाचे अर्थकारण या यात्रेवर अवलंबून असते. जनावरांचा खरेदी-विक्री शेतकरी वर्ग या यात्रेच्या माध्यमातून करत असतो. करोडोंची उलाढाल होणाऱ्या या यात्रेत घोडे, उंट, गाढव, बैल, गाय, म्हैस, कुत्रे आदींची खरेदी-विक्री होते. मात्र कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांनी कटावे, असेही आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

माळेगावची जत्रा म्हणजे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळा मानली जाते. ११ जानेवारीपासून ही यात्रा भरणार असली, तरी ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ही यात्रा होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. तसे पाहिले तर माळेगावच्या यात्रेचे शासकीय नियोजन महिन्याभरापूर्वीपासून सुरू केले जाते. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून स्टॉल, कृषी प्रदर्शन, पशू प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले जाते.