धक्कादायक ! शिवसेना नेत्याची मिरचीपूड टाकून हत्या
बातमी महाराष्ट्र

धक्कादायक ! शिवसेना नेत्याची मिरचीपूड टाकून हत्या

अमरावती : नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा बसस्थानकाजवळ बारसमोर शिवसेनेचे शहर प्रमुख अमोल पाटील (३८ वर्षे) यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून पाच जणांनी हत्या केली. शनिवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी पोलिसांनी संदीप रामदास ढोबाळे (४२), प्रवीण रामदास ढोबाळे (४०), प्रवीण ऊर्फ अविनाश एकनाथ पांडे (३०), रूपेश घागरे (२२) सर्व रा. तिवसा यांना अटक केली असून एक पसार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शनिवारी रात्री अमोल जनार्दन पाटील हे मित्रासोबत आशीर्वाद बारमध्ये आले होते. यानंतर आवारात उभे असताना हल्लेखोरांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून शस्त्राने वार केल्याने अमोल यांचा जागीच मृत्यू झाला. ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे सांगण्यात येते. आरोपी आणि मृतांमध्ये अवैध व्यवसायांवरून वाद होता, असेही कळते. अमोल पाटील यांच्यावरही दोन गंभीर गुन्हे दाखल होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रिता उईके ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले. काही तासातच चार आरोपींना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून पोलिसांनी अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. घटनेपूर्वी आरोपींनी बारचे आतील व बाहेरचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते.