तर नरेंद्र मोदी मोहन भागवत यांनाही दहशतवादी म्हणतील; राहुल गांधीचा हल्लाबोल
राजकारण

तर नरेंद्र मोदी मोहन भागवत यांनाही दहशतवादी म्हणतील; राहुल गांधीचा हल्लाबोल

नवी दिल्ली : ”जो विरोधात उभं राहतो त्याच्याविरोधात मोदी काही ना काहीतरी चुकीचं बोलत असतात. शेतकरी उभे राहिले तर शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतील. मजूर उभे राहिले तर त्यांना दहशतवादी म्हणतील. एखाद्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत मोदींविरोधात उभे राहिल्यास त्यांनाही दहशतवादी म्हटलं जाईल, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी राहुल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी उपस्थित होते. दरम्यान याआधी पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखत प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेत कारवाई केली. फक्त तीनच नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. भेटीनंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मोजक्या उद्योगपतींसाठी काम करत आहेत. ‘पंतप्रधान मोदी मोजक्या उद्योगपतींसाठी काम करतात, हे शेतकऱ्यांना माहीत आहे. कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलक शेतकरी घरी परतणार नाहीत, ही गोष्ट पंतप्रधान मोदींनी लक्षात घ्यावी. सरकारनं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन घेऊन नवे कायदे रद्द करावेत,’ असं राहुल म्हणाले.

तसेच, “कोरोनामुळे नुकसान होणार सांगितलं होतं पण कोणी ऐकलं नाही. आज मी पुन्हा सांगतोय की शेतकरी, मजुरासमोर कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही. जर पंतप्रधांनी कायदा मागे घेतला नाही तर फक्त भाजपा, आरएसएस नाही तर देशाचं नुकसान होणार आहे,” असा इशारा राहुल गांधी यांनी यावेळी दिला.

दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसनंदेखील कृषी कायद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत आज मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र काँग्रेस मुख्यालयाबाहेर कलम १४४ लागू करण्यात आलं. त्यानंतर प्रियंका गांधी यांच्यासह काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं.

प्रियंका गांधींसह इतर नेत्यांना ताब्यात घेतल्याबद्दलही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ‘अटक करायची, ताब्यात घ्यायचं हीच यांच्या कामाची पद्धत आहे. देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. लोकशाही केवळ कल्पनेत जिवंत असू शकते. पण प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात नाही,’ अशी टीका राहुल यांनी केली. चिनी सैन्यानं भारताची हजारो किलोमीटर जागा बळकावली. त्याबद्दल पंतप्रधान मोदी का बोलत नाहीत? ते गप्प का आहेत?, असे प्रश्नदेखील त्यांनी विचारले.