कोरोनामुळे एकाच दिवशी २४ वर्षीय जुळ्या भावांचा मृत्यू
देश बातमी

कोरोनामुळे एकाच दिवशी २४ वर्षीय जुळ्या भावांचा मृत्यू

मेरठ : मेरठमध्ये कोरोनामुळे एकाच दिवशी दोन जुळ्या २४ वर्षीय भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोफ्रेड वर्गीज ग्रेगरी आणि राल्फ्रेड जॉर्ज ग्रेगरी अशी या दोन भावांची नावं आहेत. २३ एप्रिल रोजी दोघांचा २४वा वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना ताप आला आणि नंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दोघेही कंप्युटर इंजिनियर होते. दोघेही हैद्राबादमध्ये नोकरी करत होते. दोघांनाही कोरोनाची लक्षणं एकाच दिवशी दिसून आली आणि कोरोनाविरुद्धचा त्यांचा लढाही एकाच काही तासांच्या अंतराने संपला. जाफ्रेड आणि जॉर्जचे वडील राफेल यांनी आपल्या दोन्ही मुलांचा मृत्यू कोरोनामुळे होईल असं कधी वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. जोफ्रेडचा मृत्यू १३ मे रोजी तर राल्फ्रेडचा १४ मे रोजी झाला. दोघांच्या मृत्यूमध्ये अवघ्या काही तासांचं अंतर होतं, असं राफेल म्हणाले.

मेरठमधील कॅनॉनमेंट परिसरामध्ये राहणाऱ्या राफेल कुटुंबियांनी जोफ्रेड आणि राल्फ्रेडवर सुरुवातीला घरीच उपचार केले. साधा ताप असेल असं कुटुंबियांना वाटलं होतं. आम्ही ऑक्सिमीटर घेतला होता. मात्र त्या दोघांची ऑक्सिजन लेव्हर ९० पर्यंत खाली आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. आम्ही त्यांना एक मे रोजी खासगी रुग्णालयात दाखल केलं, असं राफेल यांनी सांगितलं. कोरोना चाचणी केली असता दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र काही दिवसांनंतर दोघांची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली होती, असंही राफेल सांगतात. दोघांनाही कोव्हिड वॉर्डमधून सामान्य आयसीयूमध्ये हलवण्याचा विचार डॉक्टर करत होते. मात्र त्या दोघांना दोन दिवस कोव्हिड वॉर्डमध्ये ठेऊन त्यांच्या प्रकृतीमध्ये काही चढ उतार होतोय का हे पहावं अशी विनंती मी त्यांना केली होती. मात्र अचानक १३ मे रोजी जोफ्रेडचा मृत्यू झाल्याचा कॉल आम्हाला रुग्णालयातून आला, असं राफेल सांगतात.

राल्फ्रेडने त्याच्या आईला जॉफ्रेडचा मृत्यू झाला त्या दिवशीच शेवटचा कॉल केला होता. तो रुग्णालयातील बेडवरुन बोलत होता. त्यांचा आवाज जरा घाबरल्यासारखा वाटत होता. आपण रिकव्हर होत असल्याचं त्याने आईला सांगितलं. तसेच जोफ्रेडच्या तब्बेतीचीही त्याने चौकशी केली. पण जोफ्रेडचा त्यापूर्वीच मृत्यू झाल होता. जोफ्रेडला आपण दिल्लीच्या रुग्णालयात हलवल्याचं आम्ही त्याला सांगितलं. मात्र त्याला काय ते लगेच कळलं. तो त्याच्या आईला तू खोटं बोलतेस असं सांगून रडू लागला, असंही राफेल म्हणाले.