इडब्ल्यूएस आरक्षणासाठी आम्ही लाखोंचे 58 मोर्चे काढले नव्हते: मराठा क्रांती मोर्चा
बातमी महाराष्ट्र

इडब्ल्यूएस आरक्षणासाठी आम्ही लाखोंचे 58 मोर्चे काढले नव्हते: मराठा क्रांती मोर्चा

औरंगाबाद :  ”मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण सिद्ध करून ईएसबीसीमध्ये घटनात्मक आरक्षण मिळवण्यासाठी ५८ मूक मोर्चे, २ ठोक मोर्चे व ४२ तरुणांचे बलिदान द्यावे लागले आहे. EWS आरक्षणासाठी आम्ही लाखोंचे 58 मोर्चे काढले नव्हते किंबहुना आमच्या 42 बांधवांनी यासाठी हौतात्म्य पत्करलं नाही. जर 25 तारखेला आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर 26 तारखेपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि या सरकारमधील मंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही”, असा इशारा केरे पाटील यांनी दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मराठा समाजाला ईएसबीसीमध्ये घटनात्मक आरक्षण न मिळाल्यास मराठा समाज आरक्षणापासून कोसो दूर लोटला जाऊ शकतो. ईडब्ल्यूएस मराठा समाजाला कधीच मान्य राहणार नाही. उच्च न्यायालयात एसईबीसी मराठा आरक्षणाचा कायद्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तेव्हा उच्च न्यायालयानं राज्य सरकारला राज्यातील ओबीसी प्रवर्गातील जातीचा सर्वे करून निर्णय घेण्यात यावा असा आदेश दिला असताना राज्य सरकारनं यावर काहीच कारवाई का केली नाही, असा सवाल केरे पाटील यांनी विचारला आहे.

मागील मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजासाठी राज्य सरकारने EWS च्या आरक्षणाची घोषणा केली होती. EWS चं आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजीतल रोष कमी होईल, असा राज्य सरकारचा मानस होता. मात्र सरकारच्या निर्णयानंतर मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय.

मराठा आरक्षणावरील स्थगिती जर 25 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उठली नाही तर 26 जानेवारीपासून मराठा समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची किंबहुना आरक्षणाची बाजू मांडण्यात राज्य सरकार वारंवार अपयशी ठरत आहे, असं सांगताना मराठा समिती्च्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांची तात्काळ हकालपट्टी व्हावी आणि त्यांच्या जागेवर मंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा बाळासाहेब थोरात यांपैकी कुणाचीही नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी करावी”, अशी मागणी यावेळी केरे पाटील यांनी केली.

तसेच, “मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही. म्हणून मराठा विरुद्ध ओबीसी असा लावला जातोय. असा आरोपही यावेळी केरे पाटील यांनी केला. तसेच, मंत्री शपथ घेताना संविधनाला साक्ष ठेवून कोणत्याही समाजाप्रति सूडाची भावनी ठेवणार नाही, असं सांगतात. मग आरक्षणाप्रसंगी एका समाजाची बाजू घेऊन कसं काय बोलू शकतात”, असं म्हणत केरे पाटील यांनी वडेट्टीवार, भुजबळ यांच्यावर टीका केली.