पुण्यातील योग हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू
पुणे बातमी

पुण्यातील योग हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू

पुणे : ऑक्सिजनचा तुटवडा पुण्यात देखील जाणवू लागल्याची एक घटना समोर आली आहे. ऑक्सिजनअभावी पुण्यातील योग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही माहिती हॉस्पिटलमधील डॉक्टर अभिजीत दरक यांनीच दिल्यामुळे ऑक्सिजन तुटवड्याचे भीषण वास्तव आता समोर येऊ लागले आहे. दरम्यान, गेल्या २ दिवसांपासून रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे देखील डॉ. अभिजीत दरक यांनी सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एका रुग्णाचा योग हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे. याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. अभिजीत दरक यांनी सविस्तर माहिती दिली आहे. लिक्विड ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आम्ही गेल्या २ दिवसांपासून त्रस्त आहोत. रुग्णालयात सध्या ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत आणि आमच्याकडे आत्ता फक्त तासभर पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा असल्याचे डॉ. दरक यांनी सांगितल्याची माहिती वृत्तसंस्थेला दिली आहे.

दरम्यान, डॉ. दरक यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ आयसीयू बेड आणि २३ ऑक्सिजन बेड योग हॉस्पिटलमध्ये आहेत. २० ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्याचे आश्वासन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी योग हॉस्पिटलला दिले होते. पण, हा ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णालय प्रशासनाला नेमका कधी होईल, याची कोणतीही खात्री नाही. शिवाय, हे २० सिलेंडर आल्यानंतर देखील तो ऑक्सिजन फक्त पुढचे ३ ते ४ तास पुरेल, असे देखील डॉ. दरक यांनी सांगितले आहे.

आम्ही गेल्या वर्षभरापासून ५३ बेडचे कोविड सेंटर चालवत आहोत. गेल्या २ दिवसांमध्ये आम्हाला ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवला आहे. गेल्या २ दिवसांत आम्ही कसाबसा ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवला. पण आता ऑक्सिजन सिलेंडर कुठेही उपलब्ध होत नाहीत. आम्हाला किमान व्हेंटिलेटरवर असलेले आमचे रुग्ण दुसरीकडे शिफ्ट करावे लागणार असल्याचे देखील डॉ. दरक यांनी सांगितले.