…तरीही केसीआर खुल्या मैदानात यायला तयार नाहीत; सामनातून नांदेडच्या सभेवर भाष्य
राजकारण

…तरीही केसीआर खुल्या मैदानात यायला तयार नाहीत; सामनातून नांदेडच्या सभेवर भाष्य

ठाकरे गटाने आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (K C RAO) यांच्या नांदेडमध्ये पार पडलेल्या सभेवर भाष्य केले आहे.तसेच यावेळी ठाकरे गटाने मोदी सरकारवर निशाणा साधत जोरदार टोलेबाजीही केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लेखात म्हंटले आहे की,“चंद्रशेखर राव रविवारी महाराष्ट्रातील नांदेड येथे त्यांच्या पक्षविस्तारासाठी येऊन गेले. ”अब की बार किसान सरकार” असा नारा त्यांनी दिला. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर ते बोलले, पण सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत मोदी सरकारचे धोरण अमानुष आहे. शेतकऱयांच्या जमिनी, बाजार समित्या वगैरेंचे सरळ खासगीकरण करण्याचे चालले आहे. ‘सार्वजनिक कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही’, असे चंद्रशेखर राव म्हणतात; पण मोदी सरकारने जवळ जवळ बहुतेक सार्वजनिक कंपन्यांचे खासगीकरण करून त्या अदानी यांच्या खिशात घातल्या. ‘सब भूमी गोपाल की’ याप्रमाणे ‘सब कुछ फक्त अदानींचे’ हेच धोरण मोदी सरकारने राबवले व देशाला संकटात ढकलले. देशाची सर्व संपत्ती एकाच उद्योगपतीकडे जाणे हा भांडवलशाहीचा कहर आहे, पण ‘केसीआर’ यावर जपून भाष्य करीत आहेत. मोदी यांना उद्देशून ते म्हणाले की, ‘जर तुम्ही इमानदार आहात तर अदानींची चौकशी करा.’ केसीआर यांनी ही मागणी केली असली तरी ते खुल्या मैदानात यायला तयार नाहीत.”

“राव यांचा राजकीय वैरी नक्की कोण, भाजप की काँग्रेस? ते एकदा सांगून टाका. राव यांच्या पक्षाच्या आमदारांना शंभर-शंभर कोटी रुपये देऊन विकत घेण्याचा प्रयत्न झाला व भाजपकडे हे पैसे आले कोठून याचे उत्तर फुटलेल्या फुग्यात आहे. शेतकऱयांचे सरकार यायचे असेल तर ‘हिंडेनबर्ग’ने फोडलेल्या फुग्यात हवा भरून चालणार नाही. जे चंद्रशेखर राव यांचे तेच ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेसचे. केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्राच्या बरोबरीने सगळय़ात जास्त उच्छाद मांडला तो प. बंगालात. ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचाही छळ सुरूच आहे, पण या सर्व तपास यंत्रणा हिंडेनबर्गने फोडलेल्या फुग्याच्या बाबतीत गप्प आहेत.”

दरम्यान,“ममता व त्यांच्या पक्षाची लोकसभेत चांगली ताकद आहे व ते बहुधा याप्रश्नी कुंपणावर बसून आहेत. हे रहस्यच आहे. ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेस व झुंझारपणास हे शोभणारे नाही. ममता यांचे भांडण काँग्रेस पक्षाशी असू शकेल, पण हिंडेनबर्गने फोडलेला फुगा हा राष्ट्रीयदृष्टय़ा महत्त्वाचा विषय आहे. भाजप व त्यांच्या दैवतांचे मुखवटेच आता गळून पडले. ममता बॅनर्जी यांना बदनाम करणाऱ्या, त्यांचे सरकार अस्थिर करू पाहणाऱ्या या शक्तींना ताकद मिळेल असे वर्तन आता होऊ नये”,असेही लेखात म्हंटले आहे.