शासनाने उप-आरोग्यप्रमुखांच्या नियूक्तीचे आदेश पुणे मनपास द्यावेत -गोपाळदादा तिवारी
राजकारण

शासनाने उप-आरोग्यप्रमुखांच्या नियूक्तीचे आदेश पुणे मनपास द्यावेत -गोपाळदादा तिवारी

पुणे : राज्य सरकारने प्रलंबित तीन उप-आरोग्यअधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश पुणे महानगरपालिकेला द्यावेत अशा मागणीचे पत्र काँग्रेसचे प्रदेशप्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नागरिकांना सार्वजनिक आरोग्यसेवा देण्याची महापालिकांची जबाबदारी आहे. नागरिकांचा सरकारी आरोग्य केंद्रातून उपचार घेण्याकडे कल असून खाजगी उपचार सर्वांना परवडत नाहीत, हे समोर आले आहे. कोविडसारख्या परिस्थितीतसुद्धा पुणे महापालिकेकडून किमान वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील ३ उपआरोग्यअधिकारी पदे रिक्त आहेत, हे निंदनीय आहे. तरी त्यांच्या पुर्ततेबाबात शासनाने महापालिकेला त्वरित आदेश द्यावेत अशी मागणी तिवारी यांनी दिलेल्या पत्रात केली आहे. मागील वर्षी २०० तात्पुरत्या सेवेसाठी २०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु, कोरोनासारख्या गंभीर संकटाचे समूळ उच्चाटन झाले नसताना जानेवारी महिन्यातच या कर्मचाऱ्यांना महापालिकेतून सेवेतून मुक्त केले असल्याचेही तिवारी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची संपूर्ण सत्ता असूनही कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे पुण्यात आहेत. महापालिकेबरोबरच केंद्रात सत्ता, खासदार आमदारही भाजपचेच आहेत. मागील काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील कामांचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांना आरोग्य विभागातील या त्रुटी दिसल्या नसतील काय? असा प्रश्नही तिवारी यांनी उपस्थित केला आहे. आरोग्य सेवा विस्कळित झाली असून काही त्रुटी आढळून आल्या की राज्य सरकारच्या नावाने खडे फोडायचे, हे कधीपर्यंत चालणार? अशी विचारणाही तिवारी यांनी केली आहे.