रामदेव बाबांचं विधान लज्जास्पद, अमृता वहिनी गप्प कशा? कानाखाली वाजवायला हवी होती : राऊत
राजकारण

रामदेव बाबांचं विधान लज्जास्पद, अमृता वहिनी गप्प कशा? कानाखाली वाजवायला हवी होती : राऊत

मुंबई :रामदेव बाबा यांनी अशाप्रकारचं लज्जास्पद विधान केलं, तिथे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी उपस्थित होत्या. अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? असं विधान करणारा कोणी असो, त्याच्या सणसणीत कानाखाली बसायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एकीकडे महिलांच्या सुरक्षेच्या-सबलीकरणाच्या बाता करता, कायदे बनवता, ज्ञान पाजळता आणि त्याच वेळेला असंख्य महिलांच्या समोर हे भगव्या वस्त्रातले बाबा-महाराज महिलांविषयी असं बोलतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांवर सरकार गप्प बसलंय, कर्नाटकचे मुख्यमंत्री राज्यातली सोलापूर-सांगली जिल्हे खेचण्याचे दावे करतायत आणि आता असे भाजपचे प्रचारक महिलांविषयी बोलतायत तरी सरकार शांत आहे, या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीये का, हे पाहावं लागेल, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

रामदेव बाबा यांनी ठाण्यातील योगा कार्यक्रमामध्ये बोलताना महिलांविषयक केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते.

रामदेव बाबा काय बोलले होते?

महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते. त्यानंतर महिलांसाठी महा संमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महा संमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांसाठी योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला. त्यानंतर लगेच महिलांसाठी महा संमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा रामदेव यांनी भाष्य करताना म्हटले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही हरकत नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, पुढे बोलताना रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने पाहता काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा म्हणाले.

यावेळी रामदेव बाबांसोबत मंचावर शेजारीच बसलेल्या अमृता फडणवीस यांनी या विधानावर ना आक्षेप घेतला, ना कुठली प्रतिक्रिया दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर सारवासारव केली. “मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जवळून ओळखते, त्यांना मराठी भाषेविषयी प्रेम आहे, मराठी शिकत असलेले ते एकमेव राज्यपाल आहेत, मराठी बोलण्याच्या प्रयत्नान ते काही बोलून जातात, त्याचा वेगळा अर्थ काढला जातो, मात्र त्यांचे मराठी भाषेवर प्रेम आहे, मनापासून मराठी व्यक्तीवर प्रेम करणारे असे हे राज्यपाल आहेत” अशा शब्दात अमृता फडणवीसांनी कोश्यारींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय.