शेतकरी आंदोलनाचा दणका; ‘या’ राज्यातील भाजप सरकार पडणार?
राजकारण

शेतकरी आंदोलनाचा दणका; ‘या’ राज्यातील भाजप सरकार पडणार?

नवी दिल्ली : दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे हरयाणातील खट्टर सरकारला धोका निर्माण झाला आहे. राजकिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीने खट्टर सरकारने कारवाई केली आहे त्याचे परिमाण भाजपसाठी हानिकारक ठरू शकतात. हरयाणामधील भाजपचा मित्र पक्ष असलेल्या जननायक जनता पक्षाने भाजप विरोधात जाऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा विचार केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यामुळे हरयाणामध्ये भाजपच्या अडचणी वाढल्या असून जजपाने पाठिंबा काढल्यास हरयाणातील खट्टर सरकार अल्पमतात येऊन पडण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आणि त्यांच्या आई नैना चौटाला यांनी या प्रकरणावर आणखी मौन धारण केले असले तरी दुष्यंत चौटाला यांनी मोदी सरकारने या कायद्याबाबत पुनर्विचार करावा असे वक्तव्य केले आहे. सध्या हरयाणामध्ये जजपाच्या पाठिंब्यावर भाजपसरकार सत्तेत आहे.

दरम्यान, जजपा या पक्षाच्या आधीही शेतकरी आंदोलनाला आम आदमी पार्टी, शिवसेना, समाजवादी पार्टी, कांग्रेस, वाम दल, शिरोमणि अकाली दल, बसपा आणि आरजेडी या पक्षांनी समर्थन दिले आहे. उद्या (८ डिसेंबर) होणाऱ्या भारत बंद आंदोलनालाही या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तसेच शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून एनडीएतील मित्रपक्ष असलेला राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी भाजपपासून फारकत घेण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात उद्या निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी दिली आहे. असे झाल्यास भाजपला एकसोबत दोन पक्ष सोडचिठ्ठी देतील अशी माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे.

पक्षीय बलाबल
एकूण – ९०
भाजप – ४०
काँग्रेस – ३१
जजपा – १०
इतर – ०९