संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या मंत्रिपदासाठी शिवसेनेत चढाओढ सुरु
राजकारण

संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या मंत्रिपदासाठी शिवसेनेत चढाओढ सुरु

मुंबई : भारतीय जनता पक्षाने राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अनेक गंभीर आरोप झालेल्या संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही दबाव वाढला आहे. तर असा तडकाफडकी राठोड यांनी राजीनामा घेतला जाऊ नये यासाठी पक्षावर दबाव आणण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एकीकडे संजय राठोड यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेचे विदर्भातील आमदार कामाला लागले आहेत. राठोड यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा परिणाम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याचा दावा या गटाकडून केला जात आहे. त्यामुळे राठोड यांचा राजीनामा घेण्याची मागणी या गटानं लावून धरली आहे. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पूर्व, पश्चिम विदर्भाला मंत्रिपद मिळायला हवं, अशी या गटाची भावना आहे.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या मंत्रिपदासाठी विदर्भासोबतच मुंबईतले आमदारही सक्रिय झाले आहेत. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रिपदाची जबाबदारी दुसऱ्या नेत्याकडे दिली जाणार की मंत्रिपदाचा पदभार इतर एखाद्या दुसऱ्या मंत्र्याकडे दिला जाणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असणार्या गटातून मंत्रिपदासाठी जोर लावण्यास सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे आपला पत्ता कापला जाऊ नये यासाठी उत्सुक आमदार सावध पवित्र्यात आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या आमदांराची नवे मात्र अद्याप समोर आलेली नाहीत.

तर दुसरीकडे संजय राठोड यांचा राजीनामा तडकाफडकी घेतला जाऊ नये, अशी विनंती पोहरादेवीच्या महंतांनी केली आहे. राठोड यांचा राजीनामा घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आधी चौकशी होऊ द्या. दोषी आढळून येईपर्यंत त्यांचा राजीनामा घेऊ नका,’ असं आवाहन पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराजांनी केले आहे.

‘आमच्याकडून, बंजारा समाजाकडून मुख्यमंत्री ठाकरेंवर दबाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न नाही. उद्धव ठाकरे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो. आम्ही केवळ समाजाची भावना मांडत आहोत. मुख्यमंत्री, सरकारवर दबाव टाकण्याचा आमचा हेतू नाही,’ असं जितेंद्र महाराज यांनी स्पष्ट केलं. संजय राठोड पुन्हा पोहरादेवीला येऊ शकतात असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं. ‘राठोड पुन्हा पोहरादेवीला येणार असल्याचं आम्हाला त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजलं आहे. ते इथे आल्यास महंतांशी चर्चा करून पुढील वाटचालीबद्दल निर्णय घेतील,’ असं महंत जितेंद्र महाराजांचे म्हणणे आहे.