पूजा चव्हाण प्रकरण: नाहीतर आम्ही भाजपाचे सर्व आमदार राजीनामा देणार; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
राजकारण

पूजा चव्हाण प्रकरण: नाहीतर आम्ही भाजपाचे सर्व आमदार राजीनामा देणार; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मुंबई : ”महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारनं शक्ती कायदा आणण्याची तयारी सुरू केली आहे. दिशा कायद्यासाठी सरकारनं समिती स्थापन केली आहे. पण एका मंत्र्यावर इतके गंभीर आरोप होत असताना मुख्यमंत्री ठाकरे त्यांचा राजीनामा घेत नाहीत. राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर आम्ही दिशा कायद्यासाठी गठित समितीतून राजीनामे देऊ,’ असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपनं लावून धरली आहे. उद्यापासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राठोड यांच्यावर नाराज असल्याचं आम्ही अनेक दिवसांपासून ऐकत आहोत. मुख्यमंत्री नाराज आहेत. मग गेल्या १८ दिवसांपासून तमाशा कशासाठी सुरू आहे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच, राज्यात मंत्री, सत्ताधारी आणि सामान्य जनतेसाठी वेगवेगळे नियम आहेत का, असा प्रश्न फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विचारला.

राठोड यांच्याविरोधात इतके भक्कम पुरावे असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही, ऑडिओ क्लिप, पूजा चव्हाणच्या मोबाईलवर आलेले संजय राठोड यांचे ४५ मिस्ड कॉल्स, १०० नंबरवर आलेला कॉल इतके पुरावे असतानाही राठोड यांना पाठिशी का घातलं जात आहे, अशी प्रश्नांची सरबत्ती विरोधी पक्षांनी केली. नव्या कायद्यामुळे मंत्र्यांना, सत्ताधाऱ्यांना लैंगिक स्वैराचार करण्याचा अधिकार मिळतो का, या प्रकरणात दोष राठोड यांचा नाही. त्यांना वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याचं म्हणत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.