संजय राठोड राजीनामा देणार? संजय राऊतांचे सूचक ट्वीट
राजकारण

संजय राठोड राजीनामा देणार? संजय राऊतांचे सूचक ट्वीट

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालवू देणार नाही, असा इशारा भाजपाने दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पूजा चव्हाण या तरुणीनं पुण्यात आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे हे प्रकरण चर्चेत आलं होतं. त्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, असा पवित्रा भाजपने घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर मुख्यमंत्र्यांना राजीनाम्यासाठी आजचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजप सभागृहात आक्रमक अंदाजात दिसेल.

त्याचबरोबर मागील दोन दिवसांपासून संजय राठोड यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सूचक ट्विट करत संजय राठोड राजीनामा देणार असल्याच्या मुद्द्यावर अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले आहे. संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेला फोटो ट्विट केलेला आहे. “महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन”, असं लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो राऊत यांनी ट्विट केलं आहे. थोडक्यात मुख्यमंत्र्यांच्या वतीने राऊत यांनी ट्विट करत राठोड यांना एकप्रकारे इशारा दिला आहे.

विधिमंडळ अधिवेशनाला आता अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक झाले आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्यासाठी पुढचे 24 तास महत्वाचे असून पक्षानं त्यांना ‘निर्णय’ घेण्याच्या सुचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असताना संजय राऊतांनी याबद्दल भूमिका मांडली होती. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय नेते आहेत. ते मिस्टर सत्यवादी आहेत. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात ते संपूर्ण सत्य जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील. ते कुणावरही अन्याय करणार नाहीत आणि कुणाला पाठीशीही घालणार नाहीत. उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यात बोलणं झालेलं असलं तरी त्याविषयी मी बोलणं संकेताला धरून नाही,” असं राऊत म्हणाले होते.