पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपनं दुहेरी आकडा गाठल्यास ट्विटर सोडेन…
राजकारण

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपनं दुहेरी आकडा गाठल्यास ट्विटर सोडेन…

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहांनी नुकताच पश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यात असताना तृणमूल कॉंग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुका चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला धक्का देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एका बाजूला भाजपनं विधानसभेसाठी आक्रमकपणे तयारी सुरू असताना निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचं भाकीत केलं आहे. ‘पश्चिम बंगालमध्ये दुहेरी आकडा ओलांडताना भाजपला संघर्ष करावा लागेल. भाजपचं समर्थन करणारा माध्यमांमधला गट त्यांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देत आहे,’ असं प्रशांत किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. माझं ट्विट सेव्ह करून ठेवा.

भाजपनं दुहेरी आकडा गाठल्यास ट्विटर सोडेन, असंदेखील किशोर यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
तर प्रशांत किशोर यांच्या ट्विटला भाजपचे महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करून किशोर यांना खोचक टोला लगावला आहे. ‘पश्चिम बंगालमध्ये भाजपची त्सुनामी सुरू आहे. सत्तांतर झाल्यावर देश एका निवडणूक रणनीतीकाराला मुकेल,’ अशा शब्दांत विजयवर्गीय यांनी पलटवार केला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, त्यांचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत सक्रियपणे काम करत आहेत. मात्र तृणमूलचे अनेक वरिष्ठ नेते किशोर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. पक्ष सोडलेल्या अनेक नेत्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. प्रशांत किशोर आपल्या कामात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करत असल्याचा या नेत्यांनी नोंदवला आहे.