शिवसेना-भाजपमध्ये राडा सुरू असताना मुंबई काबीज करण्यासाठी ‘आप’चा प्लॅन ठरला
राजकारण

शिवसेना-भाजपमध्ये राडा सुरू असताना मुंबई काबीज करण्यासाठी ‘आप’चा प्लॅन ठरला

मुंबई : आम आदमी पक्ष (आप) मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार असून या निवडणुकीसाठी दिल्लीचा फॉर्म्युला वापरणार आहे. मुंबईकरांना मोफत पाणी आणि सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबाबत पक्षाचा अभ्यास सुरू आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आणि स्थानिक समस्या समजून घेण्यासाठी पक्षातर्फे लवकरच मोहीम सुरू केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबई महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘आप’ने या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला. पक्ष मुंबईतील सर्व २२७ जागा लढवणार आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाने कृती आराखडा आखला आहे. लवकरच आमची घरोघरी मोहीम सुरू होईल. पक्षाचे कार्यकर्ते शहरातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचतील, असे मुंबई ‘आप’चे कार्याध्यक्ष द्विजेनरा तिवारी यांनी सांगितले. ‘मुंबईत प्रत्येक प्रभागात वेगवेगळे प्रश्न आहेत. मलबार हिल आणि मानखुर्दचे प्रश्न वेगळे आहेत. पक्ष प्रत्येक मुद्दा समजून घेईल,’ असेही त्यांनी नमूद केले.

आमचे कार्यकर्ते दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल नागरिकांना माहिती देत आहेत. मुंबईच्या समस्येवर लक्ष केंद्रित करताना मुंबईत ‘दिल्ली मॉडेल’ लागू करण्याचा विचार करत आहोत. किती पाणी मोफत द्यायचे आणि बेस्टकडून कोणाला मोफत प्रवास द्यायचा, याबाबत अभ्यास सुरू आहे, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. ‘मुंबईत प्रत्येक प्रभागासाठी योजना राबवण्याचा विचार असून नागरी समस्या समजून घेत लहान-लहान बाबींवर पक्ष काम करत आहे. प्रत्येक प्रभागाच्या गरजेनुसार एक अजेंडा तयार केला जाईल,’ अशी माहिती तिवारी यांनी दिली.

रस्ते, स्वच्छता, आरोग्याबाबत जनजागृती

‘पालिका निवडणुकीसाठी तयारी करताना आमचे कार्यकर्ते प्रत्येक विभागात रस्ते, स्वच्छता, आरोग्य यांसारख्या मुंबईच्या समस्यांबाबत जनजागृती करणार आहेत. त्याचबरोबर नागरिकांना मोदी सरकारचे उद्योगपती आणि व्यावसायिकांबद्दलचे प्रेम याची माहिती देतील. केंद्र सरकारने व्यावसायिकांचे कर्ज कसे माफ केले, यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश असेल,’ असे तिवारी यांनी नमूद केले.