तुम्ही खुशाल CD लावा; चंद्रकांत पाटलांनी उडवली खडसेंची खिल्ली
राजकारण

तुम्ही खुशाल CD लावा; चंद्रकांत पाटलांनी उडवली खडसेंची खिल्ली

मुंबई : ‘“ED ही एक स्वतंत्र संस्था आहे. त्यात कोणाचाही हस्तक्षेप नसतो. भाजपा ED मागे लावते असं त्यांना वाटतंय का? EDची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. आणि राहिला प्रश्न CDलावण्याचा… तुम्ही खुशाल CD लावा. तुम्हाला कोणी रोखले आहे?”, अशा शब्दात भाजपा प्रदेशाद्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाच्या वेळी खडसे यांनी एक वक्तव्य केलं होतं. जर तुम्ही माझ्यामागे ED लावलीत तर मी तुमची CD लावेन, असं ते म्हणाले होते. त्या वक्तव्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना उत्तर दिलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपामधून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली. पुण्याजवळील भोसरी येथील भूखंडाच्या संबंधित व्यवहारांबाबत ही नोटीस पाठवण्यात आली असून त्यासाठी त्यांना ३० डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खडसे यांनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली.

महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांना EDच्या नोटीस आल्या. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. म्हणूनच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करताना EDचा उल्लेख केला होता. यामुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “कोल्हापुरात तीन पक्ष वेगळ लढण हे नाटक आहे. आधी वेगळं आणि नंतर एकमेकांना मदत करत एकत्र यायचं ही गोष्ट न कळण्याइतके आम्ही खुळे नाही. मला पक्षाने पुण्याला जायला सांगितले. मी कोथरुडला आलो. उद्या कोल्हापूरला जायला सांगितले. तर कोल्हापूरला जाणार आणि मी बॅग घेऊन तयार आहे.”

ते पुढे म्हणाले की, ”आमचे महापालिकेत आज ९७ नगरसेवक आहेत. स्वीकृत धरून १०३ होतात. आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही ती संख्या नक्कीच पार करू. तसेच, “मराठा आरक्षणाचं खापर केंद्रावर फोडणं चुकीचे असून हे सरकार घोळ घालत आहे. ओबीसीमध्ये मराठा समाजाला घालणे हा तोडगा नाही. याने गावागावात माऱ्यामाऱ्या होतील”, असेही ते म्हणाले.