राणे गेल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शिवसैनिकांकडून शुद्धीकरण!
राजकारण

राणे गेल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शिवसैनिकांकडून शुद्धीकरण!

मुंबई : मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. मात्र, नारायण राणे या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं दुधानं शुद्धीकरण केलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्यात नवा राजकीय वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी स्मृतीस्थळावर आधी दुग्धाभिषेक, त्यानंतर गोमूत्राने हे शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिथे फुलं वाहण्यात आली आहेत. दरम्यान, नारायण राणे या ठिकाणी सकाळी आले होते, त्यासाठी हे शुद्धीकरण केल्याचं सांगितलं जात आहे. आप्पा पाटील यांच्यासोबत काही शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते त्यावेळी हजर होते.

दरम्यान, आप्पा पाटील यांनी यावेळी नारायण राणे यांच्यावर टीका करताना आज ही वास्तू अपवित्र झाली. तिथे दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केलं. बाळासाहेबांची फ्रेम पाण्याने धुवून तिच्यावर दुग्धाभिषेक केला. त्यानंतर बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुलं तिथे वाहिली असल्याचे म्हटले आहे. सकाळी मी आलो होतो. पण पोलिसांनी मला आतमध्ये येऊ दिलं नाही. पण माझं रक्त मला शांत बसू देत नव्हतं. कुठेतरी ही वास्तू पवित्र होणं गरजेचं आहे असं मला वाटलं. मग बाळासाहेबांच्या वास्तूला दुग्धाभिषेक करून ती पवित्र करण्याचा माझा प्रयत्न केला, असंदेखील आप्पा पाटील म्हणाले.