मोठी बातमी: पार्थ पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात?
राजकारण

मोठी बातमी: पार्थ पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात?

पंढरपूर : पंढरपुरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूरमध्ये रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार यांना जर उमेदवारी दिली तर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय हा आणखी सोपा होईल असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंढरपुरात भारत भालके यांचा प्रचंड मोठा लोकसंपर्क होता. जनतेने निवडून दिलेले नेते होते. मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे पंढरपुरात जागा रिक्त झाली असून त्यांच्या जागी कुणाची निवड होणार अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं, अशा आशयाचं पत्र अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलं आहे. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आल्यास रखडलेली विकासकामं लवकर होतील. त्यामुळे पार्थ यांना संधी दिली जावी, अशी मागणी अमरजित पाटील यांनी केली आहे.

तसेच, प्रशांत पारिचारक गट गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपुरात सक्रिय आहे. पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाल्यास विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक विरोधात जाणार नाहीत. त्यामुळे पार्थ यांच्यासाठी निवडणूक सोपी असेल, असा एक मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे. पार्थ यांना पोटनिवडणुकीत संधी दिली जावी आणि त्यानंतर पुढे होणाऱ्या निवडणुकीत दिवंगत भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालकेंचा विचार व्हावा, असं या गटाला वाटतं.

मात्र, दुसरीकडे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याबाबत तरुणाईचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकाराव्या लागलेल्या पार्थ पवार यांचं पुनर्वसन केलं जाणार की, भारत भालके यांच्या मुलाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारत भालकेंच्या निधनानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांची वर्णी लागली आहे. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाचा एकमताने फैसला झाला. सहाय्यक निबंधक एम एस तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली.