काँग्रेसला झटका; राहुल गांधीच्या कट्टर समर्थक माजी आमदाराचा पटोलेंकडे राजीनामा
राजकारण

काँग्रेसला झटका; राहुल गांधीच्या कट्टर समर्थक माजी आमदाराचा पटोलेंकडे राजीनामा

मालेगाव : काँग्रेसला मोठा झटका बसला असून काँग्रेसचे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे कट्टर समर्थक मानले जात असलेल्या माजी आमदार आणि प्रांतिक सदस्य असिफ शेख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मालेगावमधील काँग्रेसचे माजी आमदार असिफ शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवल्याची माहिती आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

असिफ शेख यांनी पक्ष सोडण्याचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात असून आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. असिफ शेख यांचे वडील रशीद शेख हेदेखील काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत. काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते अशी त्यांची ओळख असून त्यांच्या आई मालेगाव महापालिकेच्या महापौर आहेत. असं असताना आसिफ शेख यांनी अचानक पक्ष सोडल्यामुळे अनेक तर्कवितर्कना उधाण आले असून ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लागले लक्ष लागलं आहे.

दरम्यान, असिफ शेख यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असतानाच आणखी एका चर्चेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीतच असिफ शेख प्रवेश करतील, असंही बोललं जात आहे. त्यामुळे शेख यांच्या प्रवेशावरून काँग्रेस-राष्ट्रवादीतही संघर्ष निर्माण होऊ शकतो. आगामी काळात याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.