फडणवीसांसोबत जे घडलं तेच तेजस्वीबरोबर घडणार, विरोधी पक्षनेते पदावरुन थेट उपमुख्यमंत्रिपद?
राजकारण

फडणवीसांसोबत जे घडलं तेच तेजस्वीबरोबर घडणार, विरोधी पक्षनेते पदावरुन थेट उपमुख्यमंत्रिपद?

पाटणा : बिहारमध्ये २०१७ मध्ये नव्यानं सुरु झालेला जदयू आणि भाजपचा संसार मोडण्याची शक्यता निर्माण झालीय. नितीश कुमार माजी केंद्रीय मंत्री आर.सीपी. सिंह आणि चिराग पासवान यांच्यामुळं भाजपवर नाराज आहेत. बिहारमध्ये सध्या जदयू-भाजपचं सरकार आहे. जदयू आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्यानं नितीश कुमार राजदसोबत सरकार स्थापन करतील अशा चर्चा सुरु आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शनिवारी आणि रविवारी नितीश कुमार आणि राजद नेते तेजस्वी यादव यांच्यात दोन वेळा बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे राजदनं त्यांच्या पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना पदावरुन हटवलं असून माध्यमांसोबत बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. येत्या २४ तासात बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार का हे पाहावं लागणार आहे. जदयू आणि राजद एकत्र आल्यास ज्या प्रमाणं महाराष्ट्रात जसे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते पदावरुन उपमुख्यमंत्री झाले त्याप्रमाणं तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होणार का हे पाहावं लागणार आहे.

नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये दोन बैठका?

नितीश कुमार गेल्या तीन महिन्यांपासून महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीला नितीश कुमार यांनी उपस्थिती लावली नव्हती. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला देखील नितीश कुमार उपस्थित राहिले नव्हते. दुसरीकडे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांच्यात दोन बैठका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१५ प्रमाणं नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांनी सत्ता स्थापन केल्यास तेजस्वी यादव पुन्हा उपमुख्यमंत्री होणार का हे पाहावं लागणार आहे.

नितीश कुमार आणि सोनिया गांधी यांच्यात फोनवर चर्चा
नितीश कुमार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात गेल्या पंधरा दिवसांमध्ये तीन वेळा फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची बैठक झाल्यानंतर काल त्यांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे.

काँग्रेस सतर्क
राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्यानंतर काँग्रेस देखील सतर्क झाली आहे. काँग्रेसनं देखील त्यांच्या आमदारांना पाटणामध्ये बोलावलं आहे. राजद, काँग्रेस आणि जदयूच्या आमदारांची उद्या स्वतंत्र बैठक होणार आहे. या बैठकीनंतर बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप होणार की नाही हे स्पष्ट होईल. दुसरीकडे नितीशकुमार तेजस्वी यादव यांच्यासोबत सरकार स्थापन करणार की त्यांचं हे दबावतंत्र पेल्यातील वादळ ठरणार हे पाहावं लागणार आहे.