ममता बॅनर्जींवर भाजपा विरोधकांकडून कौतुकाचा वर्षाव; कोण काय म्हणाले?
राजकारण

ममता बॅनर्जींवर भाजपा विरोधकांकडून कौतुकाचा वर्षाव; कोण काय म्हणाले?

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने मोठी कामगिरी करत आपला गड कायम राखण्याच्या दिशने वाटचाल सुरु केल्यानंतर भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे. समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी यांनी ममताचं कौतुक करत भाजपवर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपनं पश्चिम बंगालमध्ये पूर्ण ताकद लावली होती. सत्ता भाजपचीच येणार या अविर्भावत भाजपचे नेते, प्रवक्ते वावरत होते. मात्र निवडणुकीचा कौल ममतांच्या बाजूने झुकल्याने भाजपवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी लोकांच्या भल्यासाठी तसंच कोरोनाशी लढण्यासाठी एकत्रित काम करुया असंही म्हटलं आहे. शरद पवार यांनी ट्विट केलं आहे.

भाजपचे विरोधक असलेल्या आम आदमी पार्टीनं ममतांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ममतांच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करणारं ट्वीट केलं आहे. तसंच पश्चिम बंगालमधील जनतेचं अभिनंदन केलं आहे. काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीकडूनही ममतांचं अभिनंदन करण्यात आलं आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी ममतांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर द्वेष पसरवण्याऱ्यांना धडा शिकवल्याबद्दल पश्चिम बंगालच्या जनतेचे आभार मानले आहेत.

समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप द्वेषाचं राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता, आक्रमकपणे लढा देण्याऱ्या ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा असं ट्विट त्यांनी केलं आहे.