इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांत गडगडला; भारतासमोर ४२० धावांचं आव्हान
क्रीडा

इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांत गडगडला; भारतासमोर ४२० धावांचं आव्हान

चेन्नई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १७८ धावांत गडगडला आहे. भारतीय संघासमोर विजयासाठी पहिल्या डावातील २४१ धावांची आघाडी मिळून ४२० धावांचे आव्हान दिले आहे. पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी असतानाही इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसऱ्या डावात फिरकीपटू आर. अश्विन यानं सर्वाधिक ६ बळी घेतले. नदीमला दोन तर बुमराह आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. चौथ्या दिवशी भारतीय संघाला ३३७ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंड संघानं २४१ धावांची आघाडी घेतली. इंग्लंड संघानं पहिल्या डावांत ५७८ धावांचा डोंगर उभा केला होता. दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्स शून्यावर बाद झाला. त्यानंतर डॉम सिबली (१६), डॅन लॉरेन्स (१८), बेन स्टोक्स (७) आणि जो रूट (४०) एकापाठोपाठ एक जण फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाले. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या फलंदाजीवर भारतीय संघाच्या विजयाची मदार आहे.

तत्पूर्वी, जो रूटच्या द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ५७८ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांचे प्रयत्न मात्र फारच तोकडे पडले. रोहित शर्मा (६), शुबमन गिल (२९), विराट कोहली (११) आणि अजिंक्य रहाणे (१) हे चार वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी भारताचा डाव सावरला. पुजाराने ७३ तर पंतने ९१ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनेही एकाकी झुंज देत नाबाद ८५ धावा केल्या.