‘शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू; राम कदमांचा इशारा
राजकारण

‘शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू; राम कदमांचा इशारा

मुंबई : ‘शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू, अशा इशारा भाजपा आमदार राम कदम यांनी दिला आहे. दरम्यान, 19 फेब्रुवारीला दरवर्षी प्रमाणे देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्तानं विविध ठिकाणी बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. याच पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी पुन्हा खुल्या झाल्यामुळे शिवप्रेमींनी याही वर्षीचा शिवजयंती उत्सवाचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं ठरवलं होतं. पण, यंदा मात्र शिवजयंतीवर कोरोना विषाणूच्या संसर्गाचं सावट आहे. तर, राज्यात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळं गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काय लिहील आहे राम कदमांनी पत्रात
”महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून सावरत आहे. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. विविध पक्षांच्या रॅली, पदयात्रा, सभा, राज्यभर होतात. त्याला प्रशासन परवानगी देते. मात्र हिंदुत्ववादी स्वराज्य ज्यांनी सुरू केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी दिली जात नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय आणि ही शरमेची गोष्ट आहे. आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का लादले जात आहेत?

गेल्या काही दिवसात सातत्याने महाराष्ट्रात हिंदूंची गळचेपी होताना दिसते. पालघरमध्ये साधूंवर हल्ला झाला मात्र राज्य सरकारने ठोस कारवाई केली नाही. तांडव या वेबसीरिजच्या माध्यमातून हिंदू देवदेवतांचा अवमान केला. पण सरकार गप्प बसलं. आता तर शिवजयंती साजरी करण्यावर निर्बध घालून पुन्हा एकदा हिंदूंचा अवमान करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या पत्राद्वारे माझी तुम्हाला विनंती आहे की, शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.