पंतप्रधान मोदी भारतीय भुमीचे रक्षण करण्यात अपयशी
राजकारण

पंतप्रधान मोदी भारतीय भुमीचे रक्षण करण्यात अपयशी

नवी दिल्ली : “पंतप्रधान मोदी भारतीय भुमीचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. त्याऐवजी चीनसाठी त्यांनी भारताची भूमी सोडून दिली. पंतप्रधान मोदी डरपोक असून ते चीनचा सामना करु शकले नाहीत. आपल्या लष्कराच्या बलिदानाचा त्यांनी विश्वासघात केला,” अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या देसपांग प्लेन्सच्या भागाबद्दल संरक्षण मंत्री एक शब्दही बोलले नाहीत. तिथे सुद्धा चीनने अतिक्रमण केले आहे. मोदींनी भारताची भूमी चीनला दिली आहे, त्याबद्दल त्यांनी देशाला उत्तर दिले पाहिजे”. तर पूर्व लडाखच्या पँगाँग सरोवराच्या भागातून भारत आणि चीन दोघांकडून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु असताना राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले. “पँगाँग टीएसओमधील फिंगर फोरपर्यंत भारताची हद्द आहे. असे असताना, सैन्याला फिंगर तीन पर्यंत जाण्यास का सांगण्यात आले?” असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. पंतप्रधान मोदींनी भारताची भूमी चीनला दिली हे स्पष्ट होते, असे राहुल म्हणाले.

दरम्यान, गुरुवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत भारत-चीन तणावावर भाष्य केले. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की ”सप्टेंबर 2020 पासून भारत आणि चीनमध्ये वाद निवळण्यासाठी चीनसोबत विविध स्तरावर चर्चा सुरु आहे. पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भागात सहमती झाली आहे. भारत आपली एक इंच भूमीही कोणाला घेऊ देणार नाही. दोन्ही देशाच्या सैन्यांनी सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र काही मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये मतमतांतर कायम असून त्यावर चर्चा सुरू आहे.

चीन फिंगर 8 आणि भारत फिंगर 3 या सीमेवर असेल. भारत-चीन सीमेवर पूर्वीसारखी स्थिती बनवण्यात येईल. सध्या पेट्रोलिंग बंद असेल. द्विपक्षीय स्तरावर चर्चेनंतरच एलएसीवर पेट्रोलिंग केलं जाईल. तसेच, एलएसीवरील आताची परिस्थिती बिघडणार नाही याची काळजी घेणार असून कुठल्याही स्थितीत तणाव निर्माण होईल असं वर्तन सैन्याकडून होणार नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.