‘त्या’ वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज होण्याची भीती, भाजपची सारवासारव
राजकारण

‘त्या’ वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज होण्याची भीती, भाजपची सारवासारव

मुंबई : पनवेलमध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी एक वक्तव्य केलं आहे. “आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले” असं चंद्रकांतदादा म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद दिल्लीत उमटल्याचं पाहायला मिळतंय. पाटील यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गट नाराज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपकडून सावरासावर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आशिष शेलार काय म्हणाले?

माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी तत्कालीन, प्रासंगिक, त्या वेळेला कार्यकर्त्यांच्या मनातील भावार्थ त्या ठिकाणी प्रदर्शित केला. चंद्रकांत दादा पाटलांचंही ते मत नाही, ना त्यांचा तो निर्णय आहे. त्यामुळे भाजपातील या प्रस्तावात तत्कालीन कार्यकर्त्यांना जो धक्का बसला, त्याबद्दलचं विश्लेषण करणारा तो भावार्थ आहे, असं शेलार म्हणाले. चंद्रकांत पाटील यांचं भाषण कसं बाहेर आलं ते पाहत असल्याचं शेलार म्हणाल्याची माहिती आहे.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

गेल्या अडीच वर्षातील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती आणि तसा बदल झाला. हा बदल होत असताना असा एक नेता देण्याची गरज होती, जो योग्य मेसेज देईल. जो चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल. असे असताना आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले ते देवेंद्र फडणवीस होय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.