राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंना वेगळाच संशय, म्हणाले…
राजकारण

राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंना वेगळाच संशय, म्हणाले…

कोल्हापूर: राजकारणात काही लोकांना पदं मिळतात, पण त्यांना पोच नसतो. त्यांना कुठे काय बोलावं हे कळत नाही. तशीच अवस्था राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आहे, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलले होते. तेव्हा लहान मुलं कशी लग्न करत असतील, असे कोश्यारी म्हणाले. पण पूर्वीच्या काळी लहान वयात लग्न व्हायची. भगतसिंह कोश्यारी यांचं मात्र अजून लग्न झालं नाही, अशी खोचक टिप्पणी राज ठाकरे यांनी केली. ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होणाऱ्या वक्तव्यांबाबत वेगळाच संशय व्यक्त केला. अशाप्रकारची वक्तव्यं तुमचं-आमचं लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक केली जात आहेत का, याचा विचार झाला पाहिजे. अन्यथा सीमाप्रश्नाने अचानक वर डोके कसे काढले, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोणीतरी स्क्रिप्ट लिहून दिलेय का? तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व होत आहे का? आम्ही-तुम्ही सरकारला महत्त्वाच्या गोष्टींबाबत प्रश्न विचारू नयेत, म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळे सुरु आहे का? राजकारणात अशा गोष्टी केल्या जातात, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

राज ठाकरेंना तांबडा-पांढरा रस्सा खाण्याची इच्छा

या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी आपल्या कोकण दौऱ्याविषयी माहिती दिली. कोकणात जाण्यापूर्वी अंबाबाईचे दर्शन घ्यावे, यासाठी मी कोल्हापूरमध्ये आलो आहे. उद्या सकाळी १० वाजता मी अंबाबाईच्या दर्शनाला जाईन. त्यानंतर चांगला तांबडा-पांढरा रस्सा मिळाला तर खाईन, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढणार: राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत स्वबळावर लढेल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच मनसे भाजपच्या स्क्रिप्टनुसार काम करत असल्याचे आरोपही राज यांनी फेटाळून लावले. सुरुवातीच्या काळात शिवसेनेवरही अशाचप्रकारे शिंतोडे उडवण्यात आले, याची आठवण राज ठाकरे यांनी करुन दिली. शिवसेनेचा जन्म १९६६ साली झाला. त्यावेळी सगळे म्हणायचे हा पक्ष मुंबईपुरता मर्यादित आहे. त्या शिवसेनेला १९६६ नंतर मुंबई महापालिका हातात यायला१९९५ साल उजडावं लागलं. २०१४ मध्ये भाजपच्या हातात संपूर्ण बहुमत आले. मात्र, या पक्षाचा जन्म १९५२ मध्ये झाला. प्रत्येक गोष्टीला एक वेळ जातो, असे राज ठाकरे यांनी म्हटले.