नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल; शिवसेना म्हणजे….
राजकारण

नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल; शिवसेना म्हणजे….

सिंधुदुर्ग : ”कोकणात विमानतळ होणार होते. तेव्हाही शिवसेनेने विरोध केला होता. यावेळी आंदोलन करणारी शिवसेनाच होती. विकासकामांनाही शिवसेनेने वेळोवेळी विरोध केला. मात्र, एकीकडे विकासकामांना विरोध करायचा आणि दुसरीकडे उद्घाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखे येऊन बसायचे. यालाच शिवसेना असे म्हणतात,” अशा शब्दात भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी उभारलेल्या लाइफटाइम रुग्णालयाचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की ”लाइफटाइम रुग्णालय आणि महाविद्यालय याचे भूमिपूजन केले तेव्हापासून खूप विरोध करण्यात आला. शिवसेनेकडून याला सर्वाधिक विरोध करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी नवीन रुग्णालय उभारणार असून, या रुग्णालयासाठी ९०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. तिजोरीत एक पैसा नसताना ९०० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले होते, असा दावा नारायण राणे यांनी यावेळी बोलताना केला.

ते पुढे म्हणाले की, आमच्या काही डॉक्टरांना विचारले की, उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे? तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे धाडस केले. तेव्हा उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा, अशी मागणी सर्वांनी केली. त्यामुळे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उद्घाटन कार्यक्रमाला येण्याची विनंती केली. अमित शहा यांनीही तत्काळ होकार दिला, असेही नारायण राणे यांनी सांगितले. तर कोकणात विमानतळ उभारणीलाही शिवसेनेने विरोध केला होता. त्यावेळीही शिवसेनेने आंदोलन करत विरोध केला. मात्र, एकीकडे विकासकामांना विरोध करायचा आणि दुसरीकडे उद्घाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखे येऊन बसायचे. यालाच शिवसेना असे म्हणतात, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.