मोठी बातमी: संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटणार
राजकारण

मोठी बातमी: संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटणार

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलन एका निर्णायक टप्प्यावर आले आहे. अशातच आता महाराष्ट्रातून शिवसेनेच्या वतीने आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत आहेत. संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, दिल्लीत आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेवेळी शिवसेनेने शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह समोर आला. त्यामुळे मी सोमवारी दिल्लीत गेल्यानंतर सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना भेटण्याचा विचार करत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या सर्वपक्षीय बैठकीत शेतकऱ्यांशी चर्चेला तयार असल्याची भूमिका घेतली. मात्र पंतप्रधानांनी ही भूमिका 60 दिवसांपूर्वीच घ्यायला पाहिजे होती. सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात फक्त एका फोन कॉलचे अंतर असल्याचे म्हणाले. मग पंतप्रधान मोदी यांनीच पुढाकार घेऊन शेतकरी नेत्यांना फोन करावा. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून आश्वासन दिले, तरच या आंदोलनावर तोडगा निघेल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. शेतकरी नेते आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये पंतप्रधानपदाविषयी आदर आहे. त्यामुळे ते मोदींचा शब्द डावलणार नाहीत, असेही राऊत यांनी म्हटले.

शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. शुक्रवारीदेखील पश्चिम उत्तर प्रदेशात पुन्हा दडपशाहीने शेतकरी आंदोलन उखडून टाकण्याचे प्रयत्न झाले. यावेळी पोलिसांनी आणि भाजप समर्थक जमावाने शेतकऱ्यांवर लाठीमार आणि दगडफेक केली. त्यानंतर हे आंदोलन संपेल असे वाटत असतानाच आंदोलकांनी राकेश टिकेत यांच्या डोळ्यातील अश्रूंनी आंदोलनात पुन्हा प्राण फुंकले. याठिकाणी पुन्हा मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले. तेव्हा पोलिसांनी येथून काढता पाय घेतला. कोणत्याही बाजूने दगडफेक झाली तरी आपल्याच लोकांची डोकी फुटणार आहेत, हे भाजपने लक्षात घ्यायला हवे, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.