मोहन डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिली; पण कोणीही मदत केली नाही
राजकारण

मोहन डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिली; पण कोणीही मदत केली नाही

मुंबई : ”दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी रोजी मुंबईत आत्महत्या केली. भाजप नेते आणि केंद्रीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्याच्या दीड वर्ष आधी त्यांनी मदतीचा आर्त टाहो फोडला होता. त्यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. पण त्यांनी मदत केली नाही,” असा आरोप कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सचिन सावंत बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सचिन सावंत यांनी आज भाजप खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरुन भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “भाजपच्या एकाही नेत्याने मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी दुःख व्यक्त केलं नाही. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बोलत होते, पण एका खासदाराचा मृत्यू झाला तेव्हा त्याबाबत संवेदना नाही का?” असं सचिन सावंत म्हणाले. सोबतच “डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून मदतीची याचना केली होती, परंतु त्यांना कोणतीही मदत केली नाही,” असा दावा केला.

यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, ”मोहन डेलकर यांनी संसदेच्या समितीपुढे गाऱ्हाणं मांडलं होतं. त्या समितीपुढे आत्महत्या करण्याचे सूचित केलं होतं का? हे समितीने स्पष्ट करावं. मोहन डेलकर यांना मदत का केली नाही याचं स्पष्टीकरण सरकार, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे,” अशी मागणी सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच, गुजरातमध्ये हरेन पांड्या यांचा खून झाला, तो कोणी केला हे अद्याप सापडलेलं नाही. पण महाराष्ट्र सरकार तशी परिस्थिती मोहन डेलकर यांच्याबाबतीत होऊ देणार नाही. काँग्रेस हे प्रकरण तडीस लावेल.” असंही सावंत यांनी म्हंटल आहे.

सचिन सावंत पुढे म्हणाले की, ”मोहन डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून मदतीची याचना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 18 डिसेंबर रोजी पहिलं पत्र आणि दुसरं 31 जानेवारी रोजी लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी आपली याचना, होणारे अत्याचार, भाजप नेते आणि अधिकारी अपमान करतात याची माहिती दिली होती. शिवाय हे प्रत्यक्ष सांगण्यासाठी भेटीची वेळ मागितली होती, पण त्यांना भेट नाकारण्यात आली.”

“तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनाही 18 डिसेंबर आणि 12 जानेवारी रोजी डेलकर यांनी पत्र लिहिलं होतं. एक खासदार मदत मागत असताना त्याला उत्तर दिलं नाही. याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना 18 डिसेंबर, 12 जानेवारी आणि 19 जानेवारी अशी तीन पत्र पाठवून मदत मागितली होती. मग कारवाई का केली नाही? जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं का?” असे सवाल सचिन सावंत यांनी विचारले.

सचिन सावंत म्हणाले की, “भाजपच्या एकाही नेत्याने मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी दुःख व्यक्त केलं नाही. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बोलत होते, पण एका खासदाराचा मृत्यू झाला तेव्हा त्याबाबत संवेदना नाही का? त्यांच्या मृत्यूला जे जबाबदार आहे त्यांचा राजीनामा घेत नाही, आजही ते पदावर आहेत. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल तर हे मोठं षडयंत्र आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी का पाऊल उचललं नाही? त्यांचे प्राण वाचले असते, पण का वाचवले नाही?” असे अनेक सवाल त्यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत.