अन् पवारांनी पडळकरांना अनुल्लेखाने मारले !
राजकारण

अन् पवारांनी पडळकरांना अनुल्लेखाने मारले !

जेजुरी : जेजुरी इथं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. या कार्यक्रमाआधी मोठं राजकीय नाट्य घडलं आणि वातावरणही तापलं होतं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाआधीच या परिसरात दाखल होत पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला होता. नियोजित कार्यक्रमाआधी गोंधळ घालणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यावर शरद पवार काय बोलणार, याची राज्यभर उत्सुकता होती. मात्र शरद पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका केली नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला 50 वर्ष उलटून गेली आहेत. या दरम्यान पवार यांच्यावर अनेकदा सणसणाटी आरोप झाले तर कधी विखारी टीकाही झाली. मात्र या सगळ्यांवर पलटवार करण्याऐवजी शरद पवार त्याचा उल्लेखच न करता समोरच्या व्यक्तीला अनुल्लेखाने मारतात ही गोष्ट नवी नाही. आजही त्यांनी हेच हुकमी अस्त्र वापरत पडळकरांना अनुल्लेखाने मारले. जेजुरीत आज झालेल्या कार्यक्रमात पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख करणंच टाळलं.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले गोपीचंद पडळकर हे वारंवार शरद पवार यांच्यावर आक्रमक टीका करत आहेत. ‘शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत…ते जातीयवादी आणि भ्रष्टाचारी आहेत,’ अशी जहरी टीका असो वा त्यांच्या नियोजित कार्यक्रमाआधी घातलेला गोंधळ असो. गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपली नवी राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. शरद पवार हेच आपलं लक्ष्य असणार, हे गोपीचंद पडळकर यांनी अनेकदा आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.