दादा, हा पहाटेचा फ्लॉप शो नाही, हा शोले आहे, शोले; श्रीकांत शिंदेंचा अजितदादांवर हल्लाबोल?
राजकारण

दादा, हा पहाटेचा फ्लॉप शो नाही, हा शोले आहे, शोले; श्रीकांत शिंदेंचा अजितदादांवर हल्लाबोल?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक ठिकाणच्या गणपती मंडळांना भेट देत आहेत. अनेक नेत्यांच्या घरीही जात आहेत. मात्र, जाताना सोबत कॅमेरामन, फोटोग्राफर घेऊन जात आहेत. त्यावरही अजित पवार यांनी टीका केली होती. तसेच मुख्यमंत्री शिंदेंना शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून सुद्धा डिवचले होते. राज्यातील विकास कामांच्या मुद्द्यावरून आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका करण्याची अजित पवार एकही संधी सोडताना दिसत नाहीत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अजितदादांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पण आता मुख्यमंत्र्यांच्या मदतीला थेट त्यांचा मुलगा धावला आहे. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे (shrikant shinde) यांनी थेट अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. दादा, हा पहाटेचा फ्लॉप शो नाही. हा शोले आहे, शोले, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी अजित दादांना टोला लगावला आहे.

श्रीकांत शिंदे यांचे ट्विट

श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करून अजित पवार यांच्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा… हा ‘शो’ले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा! आणि हो… हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ‘ट्रेलर’नेच धडकी भरली?… पिक्चर अभी बाकी है’!!!, असं सूचक विधान श्रीकांत शिंदे यांनी ट्विटमधून केलं आहे.

अजितदादांना डिवचले

श्रीकांत शिंदे यांनी आपल्या ट्विटमधून अजित पवार यांना डिवचले आहे. खासकरून पहाटेच्या शपथविधीची आठवण करून शिंदे यांनी अजितदादांच्या वर्मावर घाव घालण्याचं काम केलं आहे. तसेच आमची युती आणि सरकार भक्कम पायावर उभं आहे, असं सांगण्याचा प्रयत्नही केला आहे.