अटकेच्या बातम्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रीया; संतापत म्हणाले…
राजकारण

अटकेच्या बातम्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रीया; संतापत म्हणाले…

मुंबई : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या बातम्यानंतर राणे यांनी यावर पहिली प्रतिक्रीया दिली आहे. राणे म्हणाले, माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मी काय साधा माणूस वाटलो का? असा सवाल त्यांनी केला आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पहा असंही यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला असून चिपळूणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नारायण राणे यांना अटकेच्या आदेशासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा. नाहीतर टीव्ही चॅनेल्सविरोधात मी गुन्हा दाखल करणार. गुन्हा नसताना पथक निघालं, अटक होणार सांगितलं जात आहे. मी काय साधा माणूस वाटलो का?, अशी विचारणा नारायण राणे यांनी केली. माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन असा इशारा यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे.

आम्ही समर्थ आहोत. दोन दगड मारुन गेले असतील तर त्यात पुरुषार्थ नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी नाशिकमधील तोडफोडीच्या घटनेवर दिली. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थोबाड फोडण्याचं वक्तव्य केलं होतं तेव्हा तो गुन्हा नव्हता का? मग त्यावेळी गुन्हा दाखल का झाला नाही?, अशी विचारणा नारायण राणेंनी केली. तसेच, मी शिवसेनेच्या आक्रमकतेला जुमानत नाही, आम्ही डबल आक्रमक आहोत असंही राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणेंनी जी शिवसेना सोडली ती शिवसेना गेली अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. मी आता रस्त्याने जाणार आहे, काय होतंय पाहूया असं आवाहन यावेळी त्यांनी शिवसेनेला दिला.