नारायण राणेंचे मुख्यमंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य; राज्यभर पडसाद
राजकारण

नारायण राणेंचे मुख्यमंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य; राज्यभर पडसाद

महाड : राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्ष झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखाली वाजवली असती असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथील पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटत असून याप्रकरणी नाशिक येथे शिवसैनिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी राणे यांना अटक करण्यांसाठी पोलिस रवाना झाले असून राणेंना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्येही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जनआशीर्वाद यात्रेनिमित्त राणे यांनी महाडमध्ये पूरग्रस्तांची संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली ते म्हणाले की प्रगत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असा मुख्यमंत्री असणे ही महाराष्ट्राची अधोगती आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान त्यांना नाही आपल्याला माहीत नसेल तर सचिवाला विचारावे त्यादिवशी स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव आहे काय असे त्यांनी कोणाला तरी विचारले, देशाचा कितवा स्वातंत्र्य दिन आहे हे त्यांना माहीतच नाही माझ्यासारखा तिथे असता तर कानाखाली वाजवली असती.

बाळासाहेबांच्या आदर्शाला तिलांजली देऊन गद्दारी करीत ते मुख्यमंत्री झाल्याची टीकाही राणे यांनी केली होती. पूरग्रस्तांबाबत राज्य सरकार योग्य मदत कार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.