निलेश राणेंनी काढली अजित पवारांची लाज
राजकारण

निलेश राणेंनी काढली अजित पवारांची लाज

मुंबई : भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे हे सातत्याने वादग्रस्त ट्विट करत असतात. आता अशाच एका ट्विटमुळे ते पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. निलेश राणे यांनी ट्विटमधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लाज काढली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत महाविकासआघाडीने मोठा विजय मिळवला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. मात्र, त्याचवेळी त्यांनी भाजपचाही खास आपल्या शैलीत समाचार घेतला होता. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

निलेश राणे यांनी ट्विट करत, वाह अजित दादा वाह!! एका वर्षापूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात?? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?, असे म्हटले आहे. निलेश राणे यांच्या या ट्विटमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते पवार?
नागपूर आणि पुण्यात बऱ्याच वर्षांपासून पदवीधर मतदारसंघांमध्ये एका पक्षाची मत्तेदारी होती. मात्र सुशिक्षित वर्ग देखील महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. पदवीधर, शिक्षक मतदार आमच्या पाठीशी आहेत हे सिद्ध झालं. बरेच जण वाचाळ बडबड करत होते. मी त्यांची नावं घेऊन कारण नसताना वेळ घालवू इच्छित नाही. मात्र हा निकाल म्हणजे त्या वाचाळविरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे. आता लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय हे या निकालांवरुन स्पष्ट झालं आहे, असं अजित पवार म्हणाले.