पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री
राजकारण

पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

देहरादून : संवैधानिक अडचणीमुळे तीरथ सिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आपला राजीनामा दिल्यानंतर उत्तराखंडमध्ये भाजप नेते आणि आमदार पुष्कर सिंह धामी यांची भाजपच्या विधिमंडळ गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. यासोबतच पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे पुढचे नवे मुख्यमंत्री असतील, हे स्पष्ट झालं आहे. पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे ११ वे मुख्यमंत्री असणार आहेत. आज सायंकाळीच ते मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करतील.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा केली. तसंच त्यांचं पुष्पहार घालून स्वागत केलं. ‘माझ्या पक्षानं एका सामान्य कार्यकर्त्याला सेवेची संधी दिलीय. जनतेच्या मुद्यांवर आम्ही सर्वांचं सहकार्य घेऊन काम करू’ अशी प्रतिक्रिया पुष्कर सिंह धामी यांनी विधिमंडळ दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर व्यक्त केली आहे. यावेळी, भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि भाजप महासचिव डी पुरंदेश्वरी यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिलं. तसंच प्रभारी दुष्यंत गौतम आणि सह प्रभारी रेखा वर्मा हेदेखील या बैठकीला उपस्थित राहिले.

कोण आहेत पुष्कर सिंह धामी?
धामी हे कुमाऊं परिसरातील खटीमा विधासनभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. ते राजनाथ सिंह यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. याशिवाय माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांचे ते विशेष कर्तव्य अधिकारी होते.