महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री! आदित्य ठाकरेंच्या वरळीत बॅनर लागला; कोणी लावला?
राजकारण

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री! आदित्य ठाकरेंच्या वरळीत बॅनर लागला; कोणी लावला?

मुंबई: शिवसेनेच्या ४० आमदारांसह एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीची साथ सोडली. राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार, अनेक पदाधिकारी त्यांच्या गटात गेले. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत अद्याप तरी शिंदेंना यश आलेलं नाही. या ठिकाणचे पदाधिकारी ठाकरेंसोबत आहेत. मात्र आता शिंदे गट वरळीत शिरकाव करत असल्याचं दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बॅनर लागला आहे. श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वागत कमानीवर शिंदेंचे फोटो आहेत. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असा उल्लेख या फोटोंखाली आहे. या कमानीवर शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो आहेत.

वरळी मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आदित्य ठाकरे विधानसभेत या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. या मतदारसंघात शिवसेनेचे एकूण तीन आमदार आहेत. त्यातील दोन जण विधानपरिषदेचे सदस्य आहेत. २०१४ मध्ये शिवसेनेचे सुनिल शिंदे या मतदारसंघातून विजयी झाले. मात्र २०१९ मध्ये त्यांनी आदित्य यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला. शिंदे यांना पक्षानं विधान परिषदेवर संधी दिली. २००९ मध्ये सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर वरळीतून बाजी मारली होती. ते गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आले. आता ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकरदेखील याच मतदारसंघात राहतात.