हैद्राबाद निवडणुकीचे निकाल आले; एमआयमला जोरदार झटका, तिसऱ्या क्रमांकावर पिछेहाट
राजकारण

हैद्राबाद निवडणुकीचे निकाल आले; एमआयमला जोरदार झटका, तिसऱ्या क्रमांकावर पिछेहाट

हैद्राबाद : एमआयएम आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या हैद्राबादमधील महानगरपालिकेच्या निवडणूकीत एमआयएमला जोरदार झटका बसला असून त्यांची तिसऱ्या क्रमांकावर पिछेहाट झाली आहे. हैद्राबाद महानगरपालिकेच्या १५० जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये पहिल्या क्रमांकावर टीआरएस, दुसऱ्या क्रमांकावर भाजप तर तिसऱ्या क्रमांकावर असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

निकालांनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून भाजपनं मात्र या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने ४६ जागा पटकावून या निवडणुकीत लक्षणीय कामगिरी केली आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएस या प्रादेशिक पक्षाला भाजपने आपला पर्याय निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे, असे पक्षाचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. हा भाजपचा सॅफ्रॉन स्ट्राइक असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

या निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे नसल्याचे टीआरएसने मान्य केले आहे, मात्र पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव म्हणाले की, निकालामुळे नाराज होण्याचे काहीच कारण नाही. टीआरएसला सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी केल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ४६.५५ टक्के इतकी होती.

यापूर्वी टीआरएसला ९९ जागा
या निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएसने चार वर्षांपूर्वी १५० पैकी ९९ जागा पटकावून बाजी मारली होती.

पक्षीय बलाबल
टीआरएस – 55 (-44)
भाजप – 48 (+44)
एमआयएम – 44 (0)
काँग्रेस – 2 (0)
रिक्त – 01