१० जुलैपासून राज्यात मुसळधार; ११ जुलैला कमी दाबाचे क्षेत्र
राजकारण

१० जुलैपासून राज्यात मुसळधार; ११ जुलैला कमी दाबाचे क्षेत्र

मुंबई : अरबी समुद्रातून मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने तसेच बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असल्याने गुरुवारपासून (ता. ८) कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. १० जुलैपासून पाऊस राज्यात सर्वदूर जोर धरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या सर्वच भागांमध्ये गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मोसमी पाऊस क्षीण झाला आहे. दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पाऊस असला, तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्याप्रमाणेच आज सकाळपासूनच मुंबई, ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातही काही ठिकाणी पाऊस सुरु झालाय. भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनीही यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली आहे.

अरबी समुद्रात सध्या मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे ८ किंवा ९ जुलैपासून कोकणात पावसाला सुरुवात होणार आहे. मध्य महाराष्ट्रापर्यंत त्याचा प्रभाव जाणवणार आहे. दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरातून कमी बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यानंतर ११ जुलैला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यांसह मध्य भारतात ९ जुलैपासून पाऊस होणार असून, ११ जुलैला त्याचा जोर वाढणार आहे.

असा आहे हवामान खात्याचा अंदाज
८ जुलै : पुणे, नगर, नाशिक, जळगावात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस. परभणी, हिंगोली, नांदेडमध्येही पावसाची हजेरी.
९ जुलै : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही भागांत विजांचा कडकडाट.
१० जुलै : मुंबई, ठाण्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत तुरळक भागात मुसळधार ते अतिवृष्टी.
११ जुलै : १० जुलैप्रमाणे मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रातील संबंधित विभागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता. विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्यांत मुसळधार, तर मराठवाडय़ातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार.