संजय राऊतांचा दावा, पत्रकार वारीशेंच्या हत्येचा सूत्रधार कोण हे शिंदे-फडणवीसांना माहिती
राजकारण

संजय राऊतांचा दावा, पत्रकार वारीशेंच्या हत्येचा सूत्रधार कोण हे शिंदे-फडणवीसांना माहिती

कोकणातील राजापूर येथे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राजापूरच्या दुर्घटनेने आता वेगळे वळण घेतले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात वार्तांकन करणारे पत्रकार शशिकांत वारिसे यांना कारने धडक देऊन ठार केल्याचा आरोप आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राऊत यांनी पत्राची सुरुवात मा. गृहमंत्री महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? असा सवाल विचारत केली आहे. यापूर्वी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, सीबीआय, पोलिस यंत्रणेचा वापर केला जात होता, आता विरोधकांची हत्या धक्कादायक आहे. या हत्याकांडाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. तसेच संजय राऊत यांनी पत्राद्वारे वारीशे यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची विनंती केली आहे.

आपल्या सारख्या प्रशासनाचा मोठा अनुभव असलेल्या नेत्याकडे गृह विभागाचे नेतृत्व असताना राज्यात दिवसाढवळ्या खून पडावेत व संबंधित गुन्हेगारांना राजाश्रय मिळावा, हे चिंताजन आहे, असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

तसेच कोकणात ४ फेब्रुवारी २०२३ ला आंगणेवाडी जत्रेत भाजपची जाहीरसभा झाली. त्या सभेत ठासून सांगितले की नाणार येथे रिफायनरी होणारच… कोण अडवतंय ते पाहू… व आपल्या वक्तव्यास २४ तास उलटत नाही तोच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारीशे यांची हत्या झाली… हा फक्त योगायोग समजावा का काही? असा सवालही संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.