शरद पवार अचानक दिल्लीत दाखल; प्रशांत किशोर भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण
राजकारण

शरद पवार अचानक दिल्लीत दाखल; प्रशांत किशोर भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार रविवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. २३ जूनपर्यंत ते दिल्लीतच असणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता असण्याचे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे. राष्ट्रवादी पक्षाने शरद पवार २३ जूनपर्यंत दिल्लीत असतील याला दुजोरा दिला आहे, मात्र त्यांनी इतर कोणतीही माहिती देण्यास नकार दिल्याचं सांगितलं आहे.

शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी बोलताना राष्ट्रवादी शिवसेनेला बाजूला करुन भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या शक्यता फेटाळल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार सरकार पाच वर्षे टिकेल, काम करेल, नुसतेच पाच वर्षे नाही तर आगामी लोकसभेला व विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करेल असं सूचक विधान केलं होतं. विशेष म्हणजे यानंतर शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात भेट झाली होती. प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली होती. त्यावरून विविध तर्क वितर्कांना उधाण आले असताना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी देशातील राजकीय परिस्थितीबाबत ही भेट झाल्याचं स्पष्ट केलं होतं.