शरद पवार युपीए’चे नवे अध्यक्ष होणार?; राष्ट्रवादीने दिले ‘हे’ उत्तर
राजकारण

शरद पवार युपीए’चे नवे अध्यक्ष होणार?; राष्ट्रवादीने दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : “युपीएमध्ये अशा प्रस्तावासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट करु इच्छित आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा गुरुवारी दिल्लीत रंगली होती. मात्र या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शरद पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला जात होता. मात्र राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट केल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

“सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काहीजणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरली असल्याचं दिसत आहे. माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या गेल्या आहेत. शेतकरी आंदोलनावरून जनतेचं लक्ष वेधण्यासाठी काही जणांकडून हेतूपुरस्सर अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असं तपसे यांनी स्पष्ट केलं.

तर दुसरीकडे, शिवेसनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ”राजकारणात काहीही होऊ शकतं. राष्ट्राचं नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या जर कुणामध्ये असेल तर ती शरद पवार यांच्यामध्ये आहे. प्रश्नांची तसंच देशाची जाण, लोकांची नाडी ओळखणं, खंबीरपणा या सर्व गोष्टी शरद पवार यांच्याकडे आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे.”

“युपीएच्या अध्यक्षपदाबाबत बोलायचं झालं तर, शिवसेना काही यूपीएची सदस्य नाही. त्यामुळे मी कसं काय याबाबत मत व्यक्त करू? महाराष्ट्रातील महाविकासआघाडीत आम्ही आहोत. पण अद्याप आम्ही युपीएचे सदस्य नाही. त्यामुळे मी त्यावर मतप्रदर्शन करणार नाही. भविष्यात राजकारणात काय होईल. हे मी आत्ता सांगू शकत नाही.” असं देखील यावेळी राऊत म्हणाले.