संजय राऊत आज गाझीपुर सीमेवर घेणार शेतकरी आंदोलकांची भेट
राजकारण

संजय राऊत आज गाझीपुर सीमेवर घेणार शेतकरी आंदोलकांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्याहून अधिक काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. देशभरातून या आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. संजय राऊत यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

”महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुखदुःखात शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवर दुपारी १ वाजता आंदोलक शेतकऱ्यांना भेटणार आहे.’ असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, “सिंघू बॉर्डरवर पोलिसांकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातोय, त्यांच्यावर लाठीचार्ज आणि अश्रूधूराचा वापर करण्यात येतोय. आता केंद्र सरकारला बळाचा वापर करुन शेतकऱ्यांना उखडून टाकायचं आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता. हे काम नक्कीच सरकारचं आहे, कारण भारतीय जनता पक्षाशी संबंधित एका गटाने हा हिंसाचार घडवल्याचं समोर आलंय.” असंही संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

दरम्यान,दोन दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनाला भेट देण्याची घोषणा केली होती. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या सर्वपक्षीय बैठकीत शेतकऱ्यांशी चर्चेला तयार असल्याची भूमिका घेतली. मात्र पंतप्रधानांनी ही भूमिका 60 दिवसांपूर्वीच घ्यायला पाहिजे होती. सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात फक्त एका फोन कॉलचे अंतर असल्याचे म्हणाले. मग पंतप्रधान मोदी यांनीच पुढाकार घेऊन शेतकरी नेत्यांना फोन करावा. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून आश्वासन दिले, तरच या आंदोलनावर तोडगा निघेल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. शेतकरी नेते आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये पंतप्रधानपदाविषयी आदर आहे. त्यामुळे ते मोदींचा शब्द डावलणार नाहीत, असेही राऊत यांनी म्हटले.