पंजाब काँग्रेसमध्ये भूकंप; नवज्योतसिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
राजकारण

पंजाब काँग्रेसमध्ये भूकंप; नवज्योतसिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

चंदीगढ : पंजाबमधील राजकीय घडामोडी थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा सोपवलेला असताना, आता पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी देखील त्यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना सिद्धू यांनी पत्र पाठवले असून त्या पत्रात ‘तडजोडी करण्यापासून माणसाचे चारित्र्य ढासळण्यास सुरूवात होते. मी पंजाबचे भवितव्य व पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यावर तडजोड करणार नाही. त्यामुळे मी पंजाबच्या प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादाने पंजाबमध्ये राजकीय घडामोडींना सुरूवात झाली. काही दिवसांनी या दोघांमध्ये सामंजस्य झाल्याचं देखील दिसून आलं होतं. मात्र, अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने पंजाबमधील राजकीय समीकरणंच बदलली. पण ही समीकरणं आता मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे. कारण कॅप्टन अमरिंदर सिंग हे आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले असून तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.