काँग्रेसचा विचार तरूणांमध्ये प्रखरतेने पेरला पाहिजे : अशोक मोहोळ
राजकारण

काँग्रेसचा विचार तरूणांमध्ये प्रखरतेने पेरला पाहिजे : अशोक मोहोळ

पुणे : काँग्रेस पक्षाला विचारांची, त्यागाची दीर्घ परंपरा लाभलेली आहे. स्वातंत्र्य लढ्यापासून ते स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने स्वावलंबी होण्याच्या दिशेने काँग्रेसने देशाचा प्रवास घडविला आहे. काँग्रेसचे हे योगदान आणि ही राष्ट्रहिताची दृष्टी आजच्या तरूण कार्यकर्त्यांमध्ये पेरली पाहिजे, रूजवली पाहिजे असे मत माजी खासदार अशोक मोहोळ यांनी व्यक्त केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजीव गांधी स्मारक समितीचे सदस्य, पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अर्बन बँकेचे संचालक सूर्यकांत उर्फ बाळासाहेब मारणे यांच्या एक्काहत्तरी निमित्त काँग्रेसचा विचार जगलेले आणि आयुष्यभर काँग्रेस पक्ष्याशी निष्ठा राखलेल्या पाच ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचा सत्कार राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून अशोक मोहोळ बोलत होते.

राजीव गांधी स्मारक समिती आणि गोपाळदादा तिवारी मित्र परिवारातर्फे लकडी पूल विठ्ठल मंदिरातील संत तुकाराम महाराज सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वश्री मधुकर सणस, भगवान धुमाळ, रामचंद्र उर्फ भाऊ शेडगे, शेखर बर्वे आणि बुवा नलावडे या पाच ज्येष्ठ काँग्रेसजनांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोहन जोशी व रमेशजी बागवे यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, उल्हास पवार आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप आदी उपस्थित होते.

अशोक मोहोळ म्हणाले की, मनाचा मोठेपणा दाखवित कार्यकर्त्यांसमोर काँग्रेसमधील ज्येष्ठांनी वस्तूपाठ निर्माण करून ठेवले पाहिजे. कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि धडाडी का कमी होत आहे, हा संशोधनाचा विषय आहे. कार्यकर्त्यांमध्ये चेतना प्रज्वलित करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर प्रयत्न झाले पाहिजे. नक्की चुका कुठे होत आहेत, त्या चुका शोधून त्यावर काम केल्याशिवाय उभारी येणार नाही. काँग्रेस हा केवळ एक राष्ट्रीय पक्ष नसून तो राष्ट्रहिताचा एक विचार आहे. लोकांपर्यंत जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेण्याच्या स्तरावर काम झाले पाहिजे.

लोकशाही रूपी स्वतंत्र भारताची निर्मितीत काँग्रेसचेच योगदान आहे त्यामुळे देशात काँग्रेसजनांचे महत्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे काँग्रेस विचारांची साथ म्हणजे राष्ट्रीय विचारांची साथ या भावनेने काँग्रेस विचारांची आयूष्यभर निष्ठा जोपासलेल्या जेष्ठ काँग्रेस जनांचा सत्कार करण्याचे ठरवल्याचे संयोजक राजीव गांधी समितीचे अध्यक्ष व काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी स्वागतपर भाषणात सांगितले..!

यावेळी बोलतांना उल्हास पवार म्हणाले, प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव हे वास्तव असले तरी काँग्रेसने आपली राष्ट्रीय ओळख जपत शक्तीहीन झालेल्या कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे. आमच्या काळात आम्ही प्रचंड संघर्ष करीत काँग्रेसमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण केले होते. राहूलजी गांधी चांगले व काम करत असून, त्यांना सत्य वस्तुस्थिती अवगत केली गेली पाहीजे.