ठाण्यात पुन्हा दिघेराज ; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का
राजकारण

ठाण्यात पुन्हा दिघेराज ; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का

मुंबई : एकीकडे ईडीने शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची मोठी कारवाई होत असताना दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यात शह देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील नवे पदाधिकारी जाहीर केले आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवणारे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाण्याचा जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीने ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का देण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. (kedar dighe appointed as shiv sena thane district chief)

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, केदार शिंदे यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अनिताताई बिर्जे यांना उपनेत्या हे पद देण्यात आलेले आहे. तसेच प्रदीप शिंदे यांची ठाणे शहरप्रमुखपदी, तर चिंतामणी कारखानीस यांची ठाणे जिल्ह्याच्या विभागीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी दिली आहे.

ठाण्यात पुन्हा दिघेराज

धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना शह देण्याचा जोरदार प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर केदार दिघे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ देत एकनाथ शिंदेवर जोरदारटीका केली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे जुने सहकारी असलेले खासदार राजन विचारे हे देखील उद्धव ठाकरे यांच्याच सोबत आहेत. पक्षात एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांना बाजूला केले होते. तेव्हापासून केदार दिघे एकनाथ शिदेंवर नाराज होते. आता त्यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.