प्रशांत किशोर करणार या पक्षात प्रवेश? चर्चांना उधाण
राजकारण

प्रशांत किशोर करणार या पक्षात प्रवेश? चर्चांना उधाण

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या एका बैठकीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. २२ जुलै रोजी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीला कमल नाथ, मल्लिकार्जुन खर्गे, ए.के. अँटनी, अजय माकन, आनंद शर्मा, हरीश रावत, अंबिका सोनी आणि के.सी. वेणूगोपाल यासारख्या मोठ्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. आठवडाभरापूर्वी झालेल्या या बैठकीत प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सहभागी करुन घेता येईल का? पक्षाच्या नियोजनानुसार त्यांना पक्षात सामावून घेता येईल का यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये त्यांच्या भूमिकेसह पक्षासाठी काही योजना आखल्या आहेत, त्या योजनांबद्दलची माहिती राहुल गांधी यांनी या बैठकीत दिली. प्रशांत किशोर पक्षाबाहेर राहून केवळ सल्लागार म्हणून काम करू शकतात का? की ते काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, याबाबत चर्चा करून राहुल गांधींनी वरीष्ठांची मतं जाणून घेतल्याचं या बैठकीत हजर राहिलेल्या एका काँग्रेस नेत्यांने सांगितले आहे.

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास पक्षाला त्याचा नक्कीच फायदा होईल. मात्र, त्यांची पक्षातील नेमकी भूमिका काय असेल, ते ठरवणं गरजेचं आहे, असं एका काँग्रेस नेत्याने सांगितलं. गेल्या वर्षी झालेल्या बिहार निवडणुकांची पार्श्वभूमी पाहता काँग्रेस किशोर यांच्या कामावर मर्यादा आणेल, असंही म्हटलं जातंय. सध्या पक्षाच्या चांगल्या कामगिरीसाठी नवनवीन कल्पना आणि रणनीती आखणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रशांत किशोर पक्षात आल्यास कोणतंही नुकसान होणार नाही. मात्र, त्यांची भूमिका आणि पक्षासाठी काम करण्याच्या क्षमतांबद्दल नक्कीच चर्चा होऊ शकते, असं एका वरीष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर इंडिया टूडेशी बोलताना म्हटलं आहे.