पठ्ठ्याने ४०व्या वर्षी चोपल्या टी-२०मध्ये ९९ धावा
क्रीडा

पठ्ठ्याने ४०व्या वर्षी चोपल्या टी-२०मध्ये ९९ धावा

न्यूझीलंडबरोबर सुरु असलेल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिज याचं शतक अवघ्या एका धावेनं हुकलं. सेडन पार्क, हॅमिल्टन येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजनं ४० व्या वर्षी ९९ धावांच्या तुफानी खेळीमुळे सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानचा ९ गड्यांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात ४० वर्षीय मोहम्मद हाफिजचीच चर्चा झाली. कारण त्न्यानं आपल्या टी२० कारकिर्दीतील सर्वोत्तम फलंदाजी प्रदर्शन केले. हाफिजनं ५७ चेंडूत ९९ धावांची तुफानी खेळी केली आहे. ५ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने हाफिजनं टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळीचं प्रदर्शन केले.

टीम साऊदीने आघाडीच्या तिन्ही फलंदाजांना माघारी धाडत पाहुण्या संघाची हालत ३ बाद ३३ अशी केली. मात्र यानंतर अनुभवी मोहम्मद हाफीजने एक बाजू लावून धरत फटकेबाजी केली. न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा ९ गडी राखत धुव्वा उडवून मालिकेवर कब्जा केला आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडकडे आता २-० अशी विजयी आघाडी आहे.